जालना : कायदे कितीही कडक झाले तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही कमी झालेले नाही. जिल्ह्यात वर्षभरात ३०० पेक्षा अधिक विवाहितेच्या छळाच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने महिलांवरील अत्याचार थांबावेत, तात्काळ मदत मिळावी म्हणून १०९१ या टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईनही नावालाच असल्याचे चित्र दिसून येते. पोलिस नियंत्रण कक्षात ही हेल्पलाईन असली तरी प्रभावी जनजागृती नसल्याने महिलांना या हेल्पलाईनबाबत पुसटशीही कल्पना नाही. ही हेल्पलाईन वाऱ्यावरच आहे. या हेल्पलाईनवर बनावट तक्रारी येत असल्याचे खुद्द पोलिसांनीच सांगितले. शासन महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आटापिटा करत असले तरी स्थानिक प्रशासन किती सजग हे लक्षात आले. या हेल्पलाईनबाबत काही पोलिसांनाही माहिती नसल्याचे समोर आले आहे. नियंत्रण कक्षातील काही कर्मचाऱ्यांना या हेल्पलाईनची परिपूर्ण माहिती असल्याचे दिसून आले. हेल्पलाईनबाबत पोलिसांनी अगदी जुजबी माहिती दिली. नोंदवहीतही फारशा तक्रारी नसल्याचे दिसून आले. एकूणच अत्याचार रोखण्यात पोलिसांची भूमिका महत्वाची असते. परंतु जिल्ह्यातील पोलिस दलाने या हेल्पलाईनची म्हणावी तशी दखल घेतली नसल्याचे वास्तव चित्र आहे. अनेक महिलांनीही आम्हाला या हेल्पलाईनबाबत काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. विद्यार्थिनी तसेच युवतीनांही हेल्पलाईनची माहिती नाही. जिल्ह्यातील महिला तसेच युवतींची छेडछाड रोखण्यासाठी दामिणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाकडून पाचशेपेक्षा अधिक रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आल्याचे दामिणी पथकाच्या प्रमुख कमल गिरी यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय अथवा विवाहित महिलांनाही आम्ही तात्काळ मदत करतो. रोडरोमिओंवर कारवाई करण्यासोबतच युवती तसेच महिलांना समुपदेशन करण्याचे कामही आमच्या पथकाकडून होत असल्याचे गिरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जिल्ह्यात महिलांच्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अत्याचार करण्याचे अथवा त्रास देण्याचे स्वरूप बदल आहे. सोशल मीडिया म्हणजेच व्हॉटसअॅप, फेसबुक आदी माध्यमांमुळे सुखी संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. अत्याचार अथवा काही कारणांमुळे विभक्त झालेल्या पती- पत्नींना आम्ही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. या केंद्राच्या माध्यमातून संसारवेल पुन्हा फुलविण्यासाठी धडपड असते. अत्याचार रोखण्यासाठी शासनाने हेल्पलाईन दिली आहे. अन्यायग्रस्त महिलांनी ही हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. - अर्चना जाधव, पोलिस उपनिरीक्षक, महिला तक्रार निवारण केंद्र
जिल्ह्यात महिला असुरक्षितच...!
By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST