वाळूज महानगर : देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या ९७ वर्षीय वृद्ध महिला भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २९) सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. अनुसया आत्माराम जाधव (रा. बजाजनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने तिला जवळपास २० फुटांपर्यंत फरफटत नेले.
अनुसया आत्माराम जाधव या मुलगा अमृत यांच्यासोबत बजाजनगरातील जयबजरंग सोसायटीत भाड्याने राहतात. अनुसया या दररोज द्वारकानगरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असतात. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्या देवदर्शनासाठी घराबाहेर पडल्या. पायी मंदिराकडे जात असताना त्यांना भरधाव जाणाऱ्या ट्रक (एम.एच.०९, ए.जी.६६६९)चा धक्का लागला. त्यानंतर ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून अनुसया या गंभीर जखमी झाल्या. त्यांना ट्रक चालकाने २० फुटांपर्यंत फरफटत नेले. दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालकाचा पाठलाग केल्याने काही अंतरावर ट्रक उभा करून चालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सहा. फौजदार आर. डी. वडगावकर, सोनाजी बुट्टे, पोकॉ. पाटील, वाहतूक शाखेचे पोकॉ. रामेश्वर कवडे, पोकॉ. दत्ता गवळी, मनोज जैन आदींनी अनुसया जाधव यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
फोटो ओळ
अपघातास कारणीभूत ट्रक तर इन्सेट मृत अनुसया जाधव.