लीलाबाई गायके यांना १० एप्रिल रोजी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुटुंबीयांनी लीलाबाई यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करुन घरी आणले होते. अशातच शनिवारी (दि.१) ६ वाजेच्या सुमारास त्यांना चक्कर येत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी (दि.२) सकाळी लीलाबाई गायके यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
----------------------
बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यात सापडला
: रामपुरी-वडगाव शिवारातील घटना
वाळूज महानगर : तीन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवारी (दि.२) सकाळी १० वाजेच्या सुमारास रामपुरी-वडगाव शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळल्याने खळबळ उडाली आहे. अर्जुन शांतीलाल बोराडे (४५, रा.रामपुरी-वडगाव) असे मृताचे नाव आहे.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अनोळखी बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक राजेंद्र बांगर यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. चौकशीत त्याचे नाव अर्जुन शांतीलाल बोराडे (४५, रा.रामपुरी-वडगाव) असल्याचे स्पष्ट झाले. बेशुद्धावस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रामपुरी-वडगाव परिसरात नदी खोलीकरणाचे काम सुरू असून, नदीतील गाळ व माती शेतकरी आपल्या शेतात घेऊन जात आहे. हायवा वाहनातील माती शेतात टाकताना अर्जुन बोराडे मातीखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
-----------------