वाळूज महानगर : जोगेश्वरीतून एक ३० वर्षीय महिला मुलास सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
अनिता विनोद आवचर (३० रा. सुंदर कॉलनी, जोगेश्वरी) ही महिला २ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुलगा अनिकेत यास सोबत घेऊन घरातून निघून गेली आहे. सर्वत्र शोधाशोध घेऊनही या दोघांचा शोध न लागल्याने अनिता आवचर हिचा पती विनोद आवचर याने पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. या बेपत्ता दोघांचा पोहेकॉ.कारभारी देवरे हे शोध घेत आहेत.
-------------------------
तिरंगा चौकात अपघाताचा धोका
वाळूज महानगर : पंढरपुरातील तिरंगा चौकात फळविक्रेते व अॅपरिक्षा चालकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताचा धोका बळावला आहे. या चौकात बजाजनगर, रांजणगाव व उद्योगनगरीत जाणारे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत थांबत असतात. मात्र चौकात विक्रेते व अॅपेचालकांनी अतिक्रमणे केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवासी व नागरिकांत नाराजीचा सुर उमटत आहे.
-------------------------
बजाजनगर मोरे चौकात खड्डे
वाळूज महानगर : बजाजनगरातील रमेश मोरे चौकातून मोहटादेवी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहे. वाहनाच्या सततच्या वर्दळीमुळे खडीही निखळून वर आल्याने दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी सुरेश गाडेकर, सिद्राम पारे, सोमनाथ शिंदे आदींनी केली आहे.
-----------------
वाळूजमहानगरात दर्पण दिन साजरा
वाळूज महानगर : वाळूजमहानगर पत्रकार संघाच्या वतीने बुधवार (दि.६) दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव पा.बनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर बोचरे, संस्थापक चंद्रशेखर कुरणे, बबनराव गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संतोष उगले, आर. के. भराड, संदीप चिखले, संतोष बारगळ, हुरखॉ पठाण, भागिनाथ जाधव, अॅड. नरेंद्र सावते, शेख महेमूद आदींची उपस्थिती होती.
-----------------------
हनुमाननगर परिसरात उघड्यावर कचरा
वाळूज महानगर :वाळूजच्या हनुमाननगर परिसरातील रस्त्यावर व्यावसायिक व नागरिक केर-कचरा टाकत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. मांस, मासे व इतर व्यवसायिक या रस्त्यावर केर-कचरा आणुन टाकत असतात. या केर-कचऱ्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. उघड्यावर केर-कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
--------------------------