पित्याचा दावा १० वर्षांपासून तर मुलाचा
एक वर्षापासून होता समितीकडे प्रलंबित
\Sऔरंगाबाद : संतोष ठाकूर आणि त्यांचा मुलगा अजय यांना तात्काळ ठाकूर या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी नंदुरबारच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला २० नोव्हेंबर २०२० रोजी दिला आहे. विशेष म्हणजे पित्याचा दावा १० वर्षांपासून तर मुलाचा एक वर्षांपासून समितीकडे प्रलंबित होता. खंडपीठाच्या आदेशानंतर समितीने अवघ्या ३ दिवसांत २३ नोव्हेंबर रोजी ठाकूर पितापुत्राला वैधता प्रमाणपत्र दिले.
जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संतोष ठाकूर यांनी २०१० साली दाखल केलेला जात प्रमाणपत्र पडताळणीचा दावा समितीने २०१५ साली अवैध ठरविला होता. मात्र, हा निर्णय त्यांना कळविला नव्हता. त्यानंतर २०१९ साली त्यांचा मुलगा अजय याच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा दावा दाखल केला होता. समितीपुढील मुलाच्या दाव्याच्या सुनावणीवेळी तब्बल ५ वर्षांनी वडिलांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आदेश त्यांच्या हाती सोपविला. त्यानंतर १० दिवसांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाचे जातप्रमाणपत्रही समितीने अवैध ठरवले होते.
सुनावनीअंती खंडपीठाने जात पडताळणी समितीचे हे दोन्ही आदेश रद्द करून ठाकूर पितापुत्राला तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला होता. अर्जदारांच्या वतीने ॲड. दिगंबर बळीराम शिंदे यांनी बाजू मांडली.