उस्मानाबाद : जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेचा आखाडा सोमवारी खऱ्या अर्थाने पेटला आहे़ अर्जविक्री करण्याच्या पहिल्याच दिवशी एक दोन नव्हे तब्बल ११३ अर्जांची विक्री झाली़ तर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे़ लोकसभा, विधानसभेतील सत्तांतर पाहता शिवसेना-भाजपासह महायुतीतील मित्रपक्ष सत्ता खेचण्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सत्ता टिकविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे़डबघाईला आलेलेली जिल्हा बँक मंद गतीने का होईना कात टाकताना दिसत आहे़ त्यातच बँकेची निवडणूक लागल्याने जिल्ह्यातील राजकीय हलचालीेंनाही मोठा वेग आला आहे़ सहकार कायद्यातील बदलानंतर प्रथमत:च प्राधिकरण मार्फत जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे़ बदलेल्या कायद्यामुळे सर्वपक्षीय नेतेमंडळींसह इच्छूकांना कायद्याचा कचाटा आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे़ काहींनी न्यायालयीन लढाई लढून मतदान प्रक्रियेसाठी स्वत:चा ठराव पात्र ठरवून घेतला आहे़ सध्या बँकेचे १७ संचालक आहेत़ मात्र, नवीन कायद्यानुसार आता १५ संचालक निवडून येणार आहेत़ तर या नवीन कायद्यामुळे थकबाकीदार, शेअर्स नसलेल्या अनेक संस्थांना वगळून २३०० संस्थापैकी केवळ ८५३ संस्थांचे ठराव पात्र ठरले होते़ त्यानंतर ३६ संस्थांनी शेअर्स भरल्याने ८८९ मतदार ठराव पात्र होते़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल एका याचिकेच्या सुनवाईनंतर निवडणूक न झालेल्या संस्थांचे ठराव अपात्र ठरविण्याचे आदेश देण्यात आले होते़ न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८८९ पैकी तब्बल २१५ संस्थांचे ठराव अपात्र ठरविले आहेत़ त्यानंतरच्या काळात काही संंस्थांनी न्यायालयात आपली बाजू मांडून घेत ठरावाला पात्रता मिळवून घेतली आहे़ या प्रशासकीय, न्यायलयीन घडामोडीनंतर आता जिल्हा निवडणुकीच्या निवडणुकीचा अखाडा खऱ्या अर्थाने पेटला आहे़ अर्ज विक्री करण्याच्या पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री झाली आहे़ अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० एप्रिल पर्यंत चालणार आहे़ तर १३ एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे़ वैध अर्जांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे़ तर १५ ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहेत़ ३० एप्रिल रोजी चिन्हांचे वाटप व ७ मे रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे़ जिल्हा बँक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्री झालेल्या अर्जांची संख्या पाहता अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)
चुरस वाढणार !
By admin | Updated: April 7, 2015 01:21 IST