आखाडा बाळापूर : जिल्ह्यातील लहान तलावांनी तळ गाठल्याने वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी थेट नागरीवस्तीकडे कूच करावी लागत आहे. सध्या बहुतांश तलाव कोरडे पडले तर काही तलावांत पाणी चोरले जात असल्याने वन्य प्राणी तिकडे फिरकत नाहीत. परिणामी प्राणी शिवार पालथा घालित असल्यामुळे पायदळी पिके तडवल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभा राहीले आहे. जिल्ह्यात पावसाने कमालीची ओढ दाखवल्याने पाणीपातळी झपाट्याने खालावली. तलाव कोरडे पडत असताना विहिरींची स्थिती दयनिय झाली. त्यामुळे सारी भिस्त असलेले तलावही कोरडे पडत आहेत. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील घोळवा, सुकळी येथील सिंचन तलाव माळधावंडा, मसोड, येहळेगाव तु., तुप्पा, जरोडा, झरा, तोंडापूर, डोंगरकडा, जामगव्हाण, येथील पाझर तलाव, कुंभारवाडी, आराटी, देववाडी, चाफनाथ, रुद्रवाडी, पाळोदी, डिग्रस, कुंभारवाडी खंडोबा, तोंडापूर, येहळेगाव तु. येथील तलावांनी केव्हाच तळ गाठला आहे. प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील हरिण, बिबट्या, कोल्हे, रोही, ससा, मोर, लांडगे या प्राण्याचा पाण्याअभावी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. पानकनेरगाव: सेनगाव तालुक्यातील सावरखेडा, कहाकर खुर्द, जयपूर, वाढोणा, सिनगी खांबा, कोंडवाडा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळशी, दाताडा आदी शिवारामध्ये वन्य प्राण्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी वर्ग वैतागला आहे. या परिसरात रानडुकर, हरण, रोही, मोकाट जानावरांचा कळप हैदास घातला आहे. शिवाय या प्राण्यांकडून पिके खान्यापेक्षा जास्त तुडविली जात आहेत. मागील कित्येक दिवसांपासून या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी वनविभागाकडे खेटे मारीत आहेत. अधिकारी सुस्त असल्यामुळे त्याचा परिणाम होत नाही.(वार्ताहर)
वन्यप्राण्यांची धावाधाव
By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST