बीड : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंबाजोगाई येथील प्रियदर्शनी क्रीडा मंडळाने ‘बालझुंबड २०१६’ हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. वर्षानुवर्षे हा उपक्रम सुरू आहे. सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे.५ ते १२ जानेवारी या दरम्यान बालझुंबड अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडत आहेत. तालुक्यासह शहरातील विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य स्पर्धा, तिसरी ते चौथी गटासाठी कथाकथन होणार आहे. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समूह - वैयक्तिक नृत्य, रांगोळी, चित्रकला, कथाकथन, निबंधलेखन, सामान्यज्ञान आदी स्पर्धा होत आहेत. स्पर्धकांसाठी प्रवेश विनामूल्य असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक राजकिशोर मोदी, समन्वयक व्ही. ए. मुंजे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांनी मंगळवारी केले आहे. (प्रतिनिधी)
बालझुंबडमधून चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळणार वाव
By admin | Updated: December 30, 2015 00:42 IST