शंकरनगर : दिसायला सुंदर नाहीस, माहेराहून ६० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून पतीकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ जून रोजी सकाळी १० वाजता आदमपूर ता. बिलोली येथे घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी आदमपूर ता. बिलोली येथील अनिल रंगोजी गव्हाणे यांचा गौतमनगर (निजामाबाद) येथील अश्विनीशी विवाह झाला. लग्नानंतर तीन वर्षे अनिल गव्हाणे याने अश्विनीला पती अनिल तू दिसायला सुंदर नाहीस, तू इकडे- तिकडे का पाहतेस? असे म्हणून संशय घेवून मारहाण करु लागला. उपाशीही ठेवू लागला. मागील काही दिवसापासून मोटारसायकल घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून ६० हजार रुपये घेवून ये, असे म्हणून जाच करु लागला. अश्विनीचे वडील निजामाबाद येथे हमाली करुन उदरनिर्वाह करीत होते. त्यांना सर्व कुटुंब सांभाळत ६० हजार रुपये देणे शक्य नव्हते. मुलीला त्रास होवू नये म्हणून माधव कल्याणकर यांनी आदमपूर येथीलच मुलीच्या मामाला व चार शहाण्या माणसांना घेवून अनिलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यर्थ. २४ जून रोजी मिरची दळून का आणली नाहीस? असे म्हणून अनिलने अश्विनीला मारहाण केली. २७ जून रोजी सकाळी दहाच्या दरम्यान, अश्विनीने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. (वार्ताहर)
पत्नीची आत्महत्या, पतीस अटक
By admin | Updated: June 29, 2014 00:24 IST