लातूर : इफेक्टिव्ह सर्व्हिसच्या नावाखाली पाणी वितरणाचे खासगीकरण करण्याचा घाट मनपाने घातला असून, येत्या सर्वसाधारण सभेत ठराव घेतला जाणार आहे. पाण्याचे वितरणच नव्हे, तर सर्वच नागरी सुविधा आऊट सोर्सिंगद्वारे देण्याचा निर्णय या सभेत घेतला जाणार आहे. सभेत हा निर्णय येण्यापूर्वीच आयुक्तांनी निविदा प्रक्रियेची तयारी केली असल्याचे समजते. लातूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत अनेक दोष आहेत. ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोठ्या दाबाने काही भागांत पाणी मिळत नाही. गळती रोखण्यासाठी मनपाला यश आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणीपुरवठा असताना नियोजन चांगले होते. मात्र मनपाकडे पाणीपुरवठा आल्यानंतर विस्कळीतपणा आला. सध्या आठ दिवसांआड पाणी सोडले जाते. परंतु, लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. हे अपयश झाकण्यासाठी मनपाने आता इफेक्टिव्ह सर्व्हिस या गोंडस नावाखाली आऊट सोर्सिंग करण्याचा जवळ जवळ निर्णय घेतला आहे. आयुक्तांनीही आऊट सोर्सिंगला दुजोरा दिला आहे. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत आऊट सोर्सिंगचा निर्णय घेऊन निविदा काढून पाणी वितरणाचे काम खासगी वितरकांकडे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. प्रत्येक झोन कार्यालयात आऊट सोर्सिंगद्वारे नियुक्त केलेले कर्मचारी राहणार आहेत. त्यांच्याकडूनच नागरी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पाणी सोडण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली जाणार आहे. पाईपलाईनची दुरुस्ती, लिकेज काढण्याची जबाबदारी खाजगी एजन्सीवर सोपविली जाणार आहे. मागच्या स्थायी समितीच्या बैठकीत मनपा आयुक्तांनी या संबंधी थोडी टिपण्णी केली होती. आता मूर्तस्वरुप देण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला जाईल. शहरातील कचरा, त्याचे व्यवस्थापन, नागरी समस्या यावर इफेक्टिव्ह सर्व्हिस देण्यासाठी आऊट सोर्सिंग हा पर्याय मनपा प्रशासनाने समोर ठेवला आहे. आता त्याला लोकप्रतिनिधी किती साथ देतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
पाणी वितरणाच्या खासगीकरणाचा घाट
By admin | Updated: January 3, 2017 23:22 IST