बीड : जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापती निवडीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. मंगळवारी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया संबंधित पंचायत समिती सभागृहात होत आहे. सकाळी ११ वाजता प्रक्रियेला सुरुवात होणार असून सभापती- उपसभापती निवडी अविरोध न झाल्यास नामनिर्देशनपत्र मागविले जातील. अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाचा अवधी दिला जाणार आहे. बीड व गेवराईच्या सभापती निवडीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. तूर्त संख्याबळ जुळविण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागले असून शह- काटशहाच्या राजकारणात कोण कोणाला भारी ठरतो? व कोण विजयाचे रंग उधळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.४बीड पंचायत समितीत अनेक वर्षांपासून आ. जयदत्त क्षीरसागर यांची हुकूमत आहे. मात्र, पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या बंडानंतर त्यांच्या सत्तेला घरातूनच सुरुंग लागला आहे. १६ सदस्यांच्या पंचायत समितीत काकू- नाना विकास आघाडीचे ६ सदस्य निवडून आले आहेत. एक अपक्षही त्यांच्या गळाला लागला आहे. त्यामुळे आघाडीचे पारडे सर्वांत ‘वजनदार’ आहे. दुसरीकडे आ. विनायक मेटेंच्या शिवसंग्रामचे ३ सदस्य असून शिवसेनेच्या ३ सदस्यांसमवेत त्यांनी गट स्थापन करुन आघाडीची बरोबरी साधली आहे. भाजपकडे १ व राष्ट्रवादीकडे २ सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी किमान ९ सदस्य हवे आहेत. सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादीच्या २ सदस्यांनी टेकू दिला तरच जि.प. मध्ये साथ देऊ अशी भूमिका आघाडीने घेतली आहे. दुसरीकडे शिवसंग्राम- शिवसेनेने भाजपकडे एका सदस्याची मदत मागितली आहे. शिवाय आघाडीच्या तंबूत गेलेल्या अपक्षाला खेचण्यासाठीही रणनीती आखली जात आहे. सभापती- उपसभापतीपदी कोण? याचे पत्ते आणखी कोणीच खोलले नाहीत. मात्र, दोन्ही गटांना सत्तास्थापनेची समान संधी असल्याने चुरस कायम आहे.गेवराईत युतीचा पेच कायम१८ सदस्यांच्या गेवराई पंचायत समितीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. भाजप सर्वाधिक ७ सदस्यांसह पुढे असून सेनेकडे ६ सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने भाजप- सेनेत रस्सीखेच सुरु आहे. आ. लक्ष्मण पवार व माजी मंत्री बदामराव पंडित हे दोघेही आपल्याच पक्षाला सभापती हवा... यावर अडून बसले आहेत. जि. प. मध्ये भाजपला साथ देण्याच्या बदल्यात सेनेला सभापतीपद मिळू शकते. राष्ट्रवादीकडे अवघे पाच सदस्य असून त्यांना सत्तेची संधी कमी आहे. मात्र, ऐनवेळी कोणती समीकरणे जुळतात? हे पाहणे रोमांचक ठरेल.वडवणी, शिरुरमध्ये घड्याळाची टिकटिकवडवणी येथे ४ सदस्यीय पंचायत समितीत राष्ट्रवादी ३ सदस्यांसह सर्वात प्रबळ पक्ष आहे. भाजपकडे केवळ १ सदस्य असून सभापतीपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. ओबीसी प्रवर्गातून एकमेव विमल शिंदे या राकॉतर्फे चिंचवण गणातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सभापतीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार आहे. शिरुरमध्ये ८ सदस्यांच्या पं. स. मध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत नाही. राकॉकडे सर्वाधिक ४ सदस्य आहेत. भाजपकडे ३ सदस्य असून काकू- नाना आघाडीनेही एका सदस्यासह चंचूप्रवेश केला आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. राकॉला सत्तास्थापनेची संधी आहे. ऐनवेळी जुळणाऱ्या समीकरणांवर सभापती- उपसभापतींच्या निवडी अवलंबून आहेत.माजलगावात सोळंकेच ‘किंगमेकर’माजलगाव पंचायत समितीत १२ पैकी ८ जागांवर राकॉ उमेदवार विजयी झाले. भाजपला ३ तर जनविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. सभापतीपद सर्वसाधारणसाठी सुटल्याने राकॉमध्ये अनेकांना अपेक्षा आहेत. माजी मंत्री प्रकाश सोळंके ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतील त्याच्या डोक्यावर सभापतीपदाचा मुकूट असेल. कृउबा सभापतीपदी इच्छुक असलेल्या जयदत्त नरवडेंचा ऐनवेळी पत्ता कट झाल्याने त्यांच्या पत्नी अल्का यांना सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागू शकते. डॉ. वसीम मनसबदार, शशांक सोळंके हे दावेदार आहेत.केजमध्ये भाजपत तिढाकेजच्या १२ सदस्यीय पंचायत समितीत भाजप ७ सदस्यांसह प्रबळ पक्ष आहे. राकॉकडे अवघे ५ सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने भाजपमध्ये अनेकांना वेध लागले आहेत. आ. संगीता ठोंबरे व रमेश आडसकर यांच्यात वर्चस्वाची छुपी लढाई सुरु झाली आहे. धनंजय देशमुख, संदीप पाटील व अनिता केदार यांची नावे सभापतीपदासाठी स्पर्धेत आहेत. देशमुख हे आडसकर गटाचे मानले जातात. त्यांना ठोंबरे गटाचा विरोध आहे. त्यामुळे सभापतीपदावरुन भाजपमध्ये तिढा कायम आहे.परळीत उत्सुकता शिगेलापरळी पंचायत समितीतील १२ पैकी ७ जागांवर राकॉचे सदस्य निवडून आले. एक जागा माकपने पटकावली असून भाजपकडे ४ सदस्य आहेत. राकॉ व माकपची आघाडी असल्याने त्यांचे संख्याबळ ८ झाले आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. कल्पना सोळंके, सुष्मा मुंडे, उर्मिला गिते, मीरा तिडके या चौघी सभापतीपदाच्या स्पर्धेत आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सूचवतील ते नाव अंतिम असेल.पाटोद्यात पुष्पा सोनवणेंना ‘लॉटरी’पाटोदा पंचायत समितीत ५ जागा भाजपने जिंकल्या असून राष्ट्रवादीकडे केवळ एक सदस्य आहे. सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून एकमेव पुष्पा सोनवणे निवडून आल्या आहेत. त्यामुळे सभापतीपदाचा ‘रिमोट’ त्यांच्या हाती जाईल हे नक्की आहे. अंबाजोगाईत तिघे स्पर्धेतअंबाजोगाई येथील पंचायत समितीतील १२ पैकी ७ जागा राकॉकडे आहेत. काँग्रेसकडे दोन सदस्य असून भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. सभापतीपद ओबीसीसाठी आरक्षित असून कडाबाई सोमनर, मीना भताने, मच्छिंद्र वालेकर यांची नावे स्पर्धेत आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व नंदकिशोर मुंदडा जे नाव निश्चित करतील, तो सभापतपदी विराजमान होणार आहे.घोडे बाजार सुरूजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षातील स्थानिक नेत्यांचा कस लागला होता. जनतेचा कौल आल्यानंतर काहींचा भ्रमनिरास झाला तर काहींच्या मनाजोगे घडले. युद्धात हरलेले नेते आता तहात जिंकण्यासाठी आपले कसब पणाला लावू लागले आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या आयुधांचा वापर सुरू आहे. मतमोजणी झाल्यापासून नवनिर्वाचित पं.स. सदस्य सहलीवर गेलेले आहेत. सत्तेसाठीचे संख्याबळ जुळविणारे नेतेच बाजीगर ठरणार आहेत. (प्रतिनिधी)
कौन बनेगा सभापती ?
By admin | Updated: March 12, 2017 23:20 IST