विठ्ठल कटके , रेणापूर रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे ३० वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या गोपीनाथराव मुंडेंनी या मतदारसंघाला आईची उपमा दिली होती. जेवढे माझे आईवर प्रेम आहे, तेवढेच रेणापूरवर आहे. रेणापूर ही माझी आई आहे, अशी कृतज्ञता बाळगणार्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने रेणापूरला आई कोण म्हणेल, असा प्रश्न या तालुक्यात निर्माण झाला आहे. लोकप्रिय असलेल्या या नेत्याच्या अपघाती मृत्यूची बातमी कळाल्यानंतर रेणापूर तालुका शोकसागरात बुडाला. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तालुक्यातील सर्व व्यवहार, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मुंडे यांनी १९८० मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्यासमोर विकासाचे स्वप्न होते. त्यानंतर दुसरी निवडणूक १९८५ साली लढविली. या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु, या पराभवाने खचून न जाता मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर विविध आंदोलने केली. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती त्यांच्यात होती. ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क होता. १९९० ला पुन्हा ते विधानसभेच्या निवडणुकीला याच मतदारसंघातून सामोरे गेले आणि ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. राजकीय, सामाजिक व विकासात्मक कार्यामुळे ते या मतदारसंघात लोकप्रिय झाले. त्यानंतर ते १९९५, २००२ च्याही निवडणुकीत याच मतदारसंघातून ते विजयी झाले. विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेते व नंतर १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले. या मतदारसंघाचा त्यांनी कायापालट केला. प्रत्येक वाडी-तांड्यांवर आणि गावात रस्त्यांचे जाळे केले. रस्ते, पाणी, वीज आदी जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे मतदारसंघातील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. तेही तितक्याच प्रेमाने या मतदारसंघावरजीव लावत होते. एवढेच नाही तर त्यांनी या मतदारसंघाला आईची उपमा दिली होती. ग्रामीण भागातील विकासाबरोबर त्यांनी स्वपक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपलेसे करून टाकले. सगळ्यांना हवाहवासा वाटणारा हा नेता सोडून गेल्याने तालुक्यावर कमालीची शोककळा पसरली आहे. त्यांनी जनमानसांचे नेतृत्व केल्यामुळे या भागातील कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या दिलदार, दिलखुलास, हजरजबाबी नेत्याला मुकली आहे, अशी भावना रेणापुरात आहे. त्यांच्या निधनामुळे तालुक्याचे भाग्य हरवल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. रेणापूरसह तालुक्यातील खरोळा, पानगाव, पोहरेगाव, रेणापूर फाटा येथे कार्यकर्त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी) ‘पन्नगेश्वर’ची निर्मिती... रेणापूर तालुक्यासह मतदारसंघातील शेतकर्यांचा विकास साधण्यासाठी सहकारी साखर कारखानदारीत मुंडे यांनी प्रवेश केला. पन्नगेश्वर, वैैद्यनाथ साखर कारखाना उभारला. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना खाजगी साखर कारखानदारीचाही पॅटर्न निर्माण केला. सिंचनासाठीही भरीव कामगिरी केली. विलासराव आता तुमच्या पदरात मतदारसंघ... रेणापूर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ उडाला. या तालुक्यातील सर्वच गावे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आली. त्यामुळे मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ परळी झाला. गेली अनेक वर्षे रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या गोपीनाथरावांनी एका जाहीर सभेमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे विलासरावांना साद घातली. हा मतदारसंघ आता मी तुमच्या ओटीत टाकतो आहे. मी या मतदारसंघावर आईचं प्रेम केलं आहे. आता माझ्या आईची जबाबदारी तुमच्यावर सोपवितो, अशी भावनिक साद गोपीनाथरावांनी विलासरावांना घातली होती.
आता रेणापूरला आई कोण म्हणेल..!
By admin | Updated: June 4, 2014 01:31 IST