औषधी भवनजवळील नाल्याचे खोदकाम करताना ‘बीएसएनएल’ची केबल तुटली. या घटनेला आता चार महिन्यांचा कालावधी उलटला असून अद्याप केबलची दुरूस्ती झालीच नाही. जुन्या शहरातील जवळपास ८०० पेक्षा अधिक दूरध्वनी बंद पडले आहेत. त्यात महापालिका मुख्यालयाचाही समावेश आहे. महापालिकेचे पीबीएक्सही बंदच आहे. याच कक्षात पावसाळी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला. आता दूरध्वनीच बंद असल्याने नियंत्रण कक्षाला फोन येण्याचा प्रश्नच नाही. महापालिकेच्या तत्पर प्रशासनाने नियंत्रण कक्षात २४ तासांसाठी ३ कर्मचारी नियुक्त केले असून वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी नियंत्रण कक्षात ८ तासांचे कर्तव्य बजावतात. आता पावसाळा संपत आला असून अजूनही हा नियंत्रण कक्ष नियंत्रणात आलाच नाही. नागरिकांना आपतकालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी साधा मोबाईल फोनही प्रशासनाने या कक्षाला दिला नाही. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झालाय, एकदाचा तो कक्ष बंद तरी करून टाका, अशी कुजबुज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
कुजबुज १ नियंत्रण कक्षच नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:05 IST