बीड : शहरातील पांगरी रोडवरील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापकाला वेतनासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी शाळेतच रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.सय्यद जावेद अहमद अमरअली असे पकडलेल्या केंद्रीय मुख्याध्यापकाचे नाव आहे. धोंडीपुरा जि.प. केंद्रीय शाळेत ते प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या केंद्रांतर्गत इंदिरानगर जि. प. प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापिका आशा इंगळे यांचे जून २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंतचे वेतन काढल्यामुळे तसेच पुढील वेतन नियमित करण्यासाठी सय्यद जावेद यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. इंगळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार सोमवारी सापळा लावण्यात आला. इंगळे यांच्याकडून चार हजार रुपये स्वीकारताना सय्यद जावेद यांना त्यांच्याच कक्षात रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, विनय बहिर, पोहेकॉ श्रीराम खटावकर, दादासाहेब केदार, पोना विलास मुंडे, पोकॉ राकेश ठाकुर, कल्याण राठोड, नितीन साळवे, यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
लाच घेताना मुख्याध्यापक चतूर्भूज
By admin | Updated: April 7, 2015 01:24 IST