औरंगाबाद : १२ तास नाकाबंदी करीत असतांना आम्ही वॉश रुमला कुठे जावे? असा सवाल, महिला पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस उपायुक्त डॉ. दीपक गिऱ्हे यांना केला. एवढेच नव्हे तर आम्ही वॉश रूमला गेलो तर आमची गैरहजेरी लावली जाते, असेही त्यांनी सांगितले. त्यांचा हा सवाल ऐकून यापुढे गैरहजेरी लागणार नाही, असे उपायुक्तांनी त्यांना आश्वासित केले.
वाढत्या कोविड संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी शहरातील ५९ चौक आणि रस्त्यांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस नाकाबंदी करीत आहेत. नाकाबंदीसाठी पुरुष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार आणि फौजदार तैनात असतात. बारा बारा तास नाकाबंदी करीत असताना पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, विनातक्रार ते काम करतात. महिला कर्मचाऱ्यांना वॉशरूमला (लघुशंका) जाण्यासाठी जवळपास सोय नसते. यामुळे त्यांना नाकाबंदीच्या पॉईंटवरून पोलीस ठाण्यात अथवा स्वतःच्या घरी जावे लागते. बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या वॉशरूमला गेल्या आणि त्याच वेळी पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त अथवा पोलीस आयुक्त हे पॉईंटवर आले तर त्यांची गैरहजेरी लावली जाते. यामुळे महिला पोलिसांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आतापर्यंत याविषयी महिला पोलीस कर्मचारी बोलत नव्हत्या. पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे हे बुधवारी रात्री ७.२० वाजता चिश्तिया चौकात आले तेव्हा त्यांनी तेथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक अवचार आणि अन्य पोलिसांना कामाविषयी सूचना दिल्या. यावेळी एका महिला कॉन्स्टेबलने त्यांना वॉश रुमला कुठे जावे? असा सवाल केला. आम्ही वॉश रुमला गेल्यावर बऱ्याचदा आमची गैरहजेरी लावली जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधले. उपायुक्तांनी त्यांना तुम्ही पॉईंट सोडताना सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना सांगून जा. तुमची गैरहजेरी पडणार नाही, असे आश्वासित केले.