औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनपाच्या बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या या ‘कर वसुलीची’तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्याचा इशारा देत पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले, असा सवाल करून अप्रत्यक्षपणे मनपा आयुक्त बकोरिया यांना टोला लगावला. पोलीस प्रमुख मनपाचे काम पाहू लागले हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल. पोलिसांचा धाक दाखवून मालमत्ताकर वसूल करण्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत बसल्यास चुकीचा संदेश जाईल. मनपा आयुक्तांना हा निर्णय घेण्याची गरज काय आहे. ही लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीत ज्याप्रमाणे पूर्ण देशात कर वसुली होते. त्याचाच वापर झाला पाहिजे. याप्रकरणी मनपा आयुक्तांकडूनदेखील माहिती घेण्यात येईल, असे पालकमंत्री कदम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी थांबविण्याचे काम केले पाहिजे. वाळूज परिसरातील सागर नाडे या तरुणाच्या आत्महत्येला पोलीस आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा पूर्णत: कू्ररपणा असून, पोलीस आयुक्तांची ही दहशत खपवून घेतली जाणार नाही. भाजपची भूमिकाउपमहापौर प्रमोद राठोड यांनी मालमत्ताकरप्रकरणी काही तक्रारी असतील तर त्या नगरसेवकांमार्फत सोडविण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी भाजप नगरसेवकांकडे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, १० वर्षांपासून काही बड्या मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. तो कर तर पालिकेला मिळालाच पाहिजे. सर्वसामान्यांचा कर वसुलीसाठी पालिका दारात उभी राहते. परंतु बडे थकबाकीदार अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यांच्याकडून कर मिळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. आयुक्तांनी पोलिसांकडे जाण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतले असते तर हा वाद उफाळला नसता, असे मत भाजपने व्यक्त केले.
पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले?
By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST