नांदेड: नांदेड परिमंडळातील एकूण २४५ फिडरपैकी केवळ ८७ फिडर भारनियमनमुक्त आहेत़ ६५ टक्के फिडरवर भारनियमन केले जात आहे़ वीजबिल वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे़ विजेचे वितरण व वाणिज्यक हानी वाढत असल्याने एकूण फिडरपैकी ६५ टक्के अर्थात १५८ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे़ ही परिस्थिती सुधारण्यासाठी चालू बिलासह थकबाकी वसूल करणे व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे अपरीहार्य बनले आहे़ हे काम करत असताना वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, कामात अडथळे निर्माण केले जातात़ नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे भिवाजी साजणे या कर्मचाऱ्यास २५ जून रोजी एका ग्राहकाकडून मारहाण केली़ नांदेड परिमंडळात नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो़ कृषी, स्वतंत्र, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी वर्गावारीतील फिडर वगळून उर्वरित २४५ फिडर परिमंडळात आहेत़ त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ९९ फिडर असून यापैकी ५७ फिडर भारनियमनमुक्त आहेत़ परभणी ७९ पैकी ६ तर हिंगोली जिल्ह्यात ६७ पैकी २४ फिडर भारनियमनमुक्त आहेत़ ही आकडेवारी पाहता विजेची सर्वाधिक हानी परभणी जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट होते़ सरासरी ३५ टक्के फिडर भारनियमनमुक्त असून ६५ टक्के फिडरवर विजेचे वितरण व वाणिज्यक हानी प्रमाणापेक्षा अधिक असल्याने भारनियमन करावे लागते़ शहरी भागात ४५ टक्के तर ग्रामीण भागातील फिडर वीज हानीत ४२ टक्यांपेक्षा खाली असतील तर येथे भारनियमन केले जात नाही़ भारनियमनातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी स्वत: होवून नियमितपणे वीजबिल भरणे गरजेचे आहे़ प्रसंगी वसुलीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यास सहकार्य करणे आवश्यक आहे़ शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अथवा मारहाण करणाऱ्या विरुद्ध पोलिसांत कारवाई होतेच़ शिवाय अशा कृत्याने तो भाग भारनियमनमुक्त होत नाही़ भारनियमनमुक्तीसाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणे मुख्य अभियंता आऱजी़ शेख यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
परिमंडळातील ६५ टक्के भागात भारनियमन
By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST