उमरगा : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर तहसीलदार अरविंद बोळंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई केली़ कारवाईदरम्यान चालकासह इतर इसम फरार झाले आहेत़ महसूल प्रशासनाने या प्रकरणात वाहन मालकांना नोटीसा बजावल्या आहेत़उमरगा शहरात अवैध वाळू वाहतुकीस ऊत आला आहे़ सध्या वाळू विक्रीला शासनाने बंदी घातली असली तरी अवैधरित्या वाळू विक्री जोमात सुरू आहे़ ३२ हजाराला ४ ब्रास वाळूची गाडी विकली जात असून, शहरात दररोज हजारो ब्रास वाळू चोरून विकली जात आहे. महसूल प्रशासनाकडून नियमित कारवाई होत नसल्याने दररोज अनेक गाड्यांमधून वाळूची तस्करी होत आहे़ मात्र, मंगळवारी उमरगा शहरात दोन ठिकाणी तहसीलदारांनीच अवैधरित्या वाळू आणलेल्या दोन वाहनांवर (क्ऱ एम.एच.२५- यू ९८७७ व एम.एच.२५- एफ ५६) कारवाई केली़ ही वाहने उमरगा पोलिस ठाण्यात लावण्याबाबत सांगण्यात आले़ चालकांनी वाहने पोलीस ठाण्यात लावून पोबारा केला़ चालक तहसील कार्यालयात हजर झालेच नाहीत़ त्यामुळे तहसीलदारांनी सायंकाळी उशिरा या वाहन मालकांना नोटीसा बजावत त्यांना बुधवारी तहसील कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याचे तहसीलदार अरविंद बोळगें यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी अचानक कारवाईसत्र हाती घेतल्याने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे़
अवैैधरित्या वाळू वाहतूक
By admin | Updated: January 3, 2017 23:26 IST