जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपिस्थतीत जलसंपदा, जलसंधारण व कृषी विभागाच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात लोकसहभागातून झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. चांगला पाऊस पडल्यानंतर पाणी साचून जलयुक्तच्या कामांची फलश्रुती दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडेकर, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गच्चे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर उपस्थित होते.जलयुक्त शिवाराची निवड करताना जे गाव यादीत काही कारणास्तव बसत नसेल, परंतु तेथे जलयुक्त शिवाराची कामे करणे आवश्यक आहे तेथे अधिकाऱ्यांनी अशा गावाचा समावेश करण्यासाठी त्याबाबत भौतिक मुल्यांकन करणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यातील जुन्या बंधाऱ्याची दुरूस्ती करणे, यांत्रिकी विभागाच्या कामकाजा बाबत उणिवा, अभियंता व अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त पदांबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने तात्काळ पाठवावेत, विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणे महत्वाचे असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. यावेळी आ. खोतकर यांनी जलयुक्त शिवार अभियांनाअंतर्गत वंचित असलेल्या अजून काही गावाची निवड करणे आवश्यक असून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त निधी देण्याच्या सूचना केल्या. एलसीडी प्रोजेक्टद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक तांभाळे यांनी जलयुक्तमध्ये झालेल्या कामांची माहिती दिली.
जिल्ह्यात जलयुक्तची कामे समाधानकारक
By admin | Updated: July 3, 2016 00:25 IST