परभणी : प्रभाग समिती अ अंतर्गत असलेल्या जलवाहिनीला १६० ठिकाणी गळती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत दिली़ प्रभाग समिती अ ची बैठक येथील राजाराणी मंगल कार्यालयाच्या सभागृहात सभापती आशाताई नर्सीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यावेळी प्रभाग समिती प्रमुख सय्यद इम्रान, गटनेते दिलीप ठाकूर, सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, गोविंद पारडकर, अमीन शेख नबी आदींची उपस्थिती होती़ या बैठकीत प्रभाग समिती अंतर्गत निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर चर्चा झाली़ चर्चेमध्ये जलवाहिनीच्या गळतीचा विषय समोर आला़ त्यावेळी या प्रभागामध्ये जलवाहिनीला १६० ठिकाणी गळती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ शहरातील दिवाबत्तीच्या प्रश्नावर नगरसेवक सचिन अंबिलवादे, सुनील देशमुख, संगीता मुळे, संगीता कलमे यांनी प्रश्न उपस्थित केला़ आगामी काळात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पथदिवे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली़ त्यावर येत्या दोन दिवसांत पथदिवे लावावेत, विशेष करून वसाहतींमध्ये पथदिवे लावण्याची सूचना आशाताई नर्सीकर यांनी केली़ सणासुदीच्या काळात विजेचे भारनियमन करू नये, असे पत्र विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी वीज कंपनीला दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ (प्रतिनिधी)प्रभाग समिती अ अंतर्गत स्वच्छतेच्या विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाली़ गावठाण परिसरामध्ये स्वच्छता होत नाही़ घंटा गाड्या वेळेवर येत नाहीत़ असा मुद्दा नगरसेवक दिलीप ठाकूर यांनी उपस्थित केला़ मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी दुकानासमोरील नालीत कचरा टाकतात़ असेही यावेळी समोर आले़ त्यावर जो व्यापारी दुकानातील कचरा नालीत टाकेल किंवा नाली बुजवेल, अशांना नोटीस देऊन पाच हजार रुपये दंड लावावा, असा आदेश नर्सीकर यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला़ सध्या सणाचे दिवस असल्याने शहरात स्वच्छता करावी, त्यासाठी खाजगी निविदा मागवावी, प्रभाग समिती अंतर्गत २५ कर्मचारी कामावर घ्यावेत, अशी मागणी सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, दिलीप ठाकूर, अमीन शेख नबी, गोविंद पारडकर, संगीता कलमे, संगीता मुळे यांनी केली़
जलवाहिनीला १६० ठिकाणी गळती
By admin | Updated: August 29, 2014 01:30 IST