लातूर : शहरालगत असलेल्या आर्वी गाव व परिसरात पाणी देण्यासाठी बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीत हरंगुळ व साई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पंपावरून मोठ्या दाबाने पाणी घेतले जात होते. मात्र बार्शी रोडवरील १४ लाख लिटर क्षमतेची टाकी कधी ओव्हरफ्लो झाली ते संबंधित कर्मचाऱ्यांना समजले नाही. तब्बल अर्धा तास टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. आताही टंचाईच आहे. अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने लातूर शहराला पाणीपुरवठा होणारा मांजरा प्रकल्प कोरडाच आहे. नागझरी व साई बॅरेजेस भरले; पण त्यातील पाणी झपाट्याने उतरले आहे. ३.३० एमएमक्यूब पाणीसाठा अवघ्या १७ दिवसांतच २.०८ एमएमक्यूबवर आला आहे. पाणी वितरणाचे योग्य आणि सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र मनपा प्रशासन अद्याप बेफिकीर आहे. त्याचाच प्रत्यय रविवारी सकाळी ११ वाजता आला. बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीत हरंगुळ व साई जलशुद्धीकरण येथील प्रत्येकी एका पंपाद्वारे मोठ्या दाबाने पाणी घेण्यात आले. काही वेळातच टाकी ओव्हरफ्लो झाली. तब्बल अर्धा तास चोहोबाजूंनी पाणी वाया गेले. बार्शी रोडवरील नागरिकांनी तात्काळ मनपा प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर पाणीपुरवठ्याचे शाखा अभियंता डी.जी. यादव घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासानंतर व्हॉल्व आणि पंप बंद केल्यानंतर वाया जाणारे पाणी थांबले. (प्रतिनिधी)
बार्शी रोडवरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो; लाखो लिटर पाणी वाया
By admin | Updated: August 22, 2016 01:27 IST