परभणी : ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली. ४०२ योजनांना जिल्ह्यात मान्यता मिळाली असली तरी यापैकी २७० योजनांची कामे अजूनही अपूर्णच आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविली जाते. भारत निर्माण कार्यक्रम आणि ग्रामीण राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यात ४०२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी केवळ १३२ योजना पूर्ण झाल्या असून, २७२ योजनांची कामे अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत. परभणी तालुक्यामध्ये ७१ योजनांना मान्यता मिळाली आहे, त्यापैकी २८ गावची पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून, ४३ गावांतील योजना रखडल्या आहेत. जिंतूर तालुक्यात ५३ गावांमध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. परंतु या तालुक्यातील केवळ ६ योजना पूर्ण झाल्या असून, ४७ योजना अजूनही अपूर्ण आहेत. पालम तालुक्यात ६२ पैकी ९ योजनांची कामे पूर्ण झाली असून, ५३ गावांतील कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भेडसावली नाही. परंतु अनेक गावांना पाणी उपलब्ध असतानाही योजना सुरू नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या योजना तातडीने पूर्ण करुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे हाती घेतल्यास पाणीटंचाई बर्यापैकी दूर होऊ शकते. (प्रतिनिधी)
अडीचशे पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात अपूर्ण
By admin | Updated: May 25, 2014 01:11 IST