हिंगोली : हिंगोली शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत आज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या असून प्रसंगी तोटी न आढळल्यास नळजोडणी तोडण्याचे आदेश देण्यात आले.हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणात केवळ मृतसाठा उरला आहे. त्यावरच शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. शिवाय नव्या जलवाहिनीमुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. मात्र पाण्याचा अपव्यय झाल्यास भविष्यात टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शहरात नवीन वाहिनी टाकण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणासह सर्वत्रच नळाला तोट्या बसवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. तर जे आवाहन करूनही तोटी बसविणार नाहीत, त्यांना ही सक्ती करण्यास बजावण्यात आले. त्यानंतर थेट जोडणी तोडण्याची कारवाई करावी, असे सांगितले. पालिकेच्या पथकाद्वारे तपासणी सुरू करण्यासही सांगण्यात आले. तर पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीलाही पाणी अपव्ययाबाबत नोटीस देण्यात आली आहे.या बैठकीस नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
पालिकेत पाणीपुरवठ्याची बैठक
By admin | Updated: November 28, 2014 01:08 IST