औरंगाबाद : जिल्ह्याचे तापमान जसे वाढू लागले आहे, तसा त्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या सुरुवातीस सर्वाधिक भूजल पातळी खोलवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. पाच वर्षांत दरवर्षी सुमारे १० मीटर या प्रमाणात पाणीपातळी खाली जात आहे. ही बाब गंभीर असल्यामुळे त्याचा परिणाम आगामी काळात जलसंकट घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे कार्यालय आहे. कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांकडून भूजल सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घेतले जात आहे. यंत्रणेने तयार केलेल्या अहवालानुसार भूजल खोलवर जात असल्याचे अनुमान लावणे शक्य आहे. परंतु कोणत्या भागात किती पाणी आहे, याचा निश्चित अंदाज लावणे यंत्रणेला शक्य नाही, अशी खंत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जमिनीच्या पृष्ठभागापासून खाली खोल १५० ते २०० फुटांपर्यंत पाणीपातळी गेली आहे. ते उपसण्यासाठीदेखील नागरिक मागे पुढे पाहत नाहीत. केरळ आणि तामिळनाडूतील ‘रॉकब्रेक’ करणाऱ्या बोअरवेल्सच्या ट्रकने शहर व जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भूजल पातळी खोलवर जात असताना विंधन विहिरी घेण्याचा सपाटा सुरू आहे. हातपंप, विंधन विहिरी खोदण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत; परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि शासनाकडून मार्गदर्शन होत नसल्यामुळे जिल्ह्यात भूजलावर डाका टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.
पाणी गेले खोलच खोल...!
By admin | Updated: April 6, 2016 01:25 IST