जालना: जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेवर १९३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जालनेकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी जालनेकर पाणीटंचाईने त्रासले होते. त्यावेळी जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेनेच उन्हाळ्या अखेर का असेना शहरवासियांना दिलासा दिला. गेल्यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे टंचाई जाणवली नाही. याही वर्षीच्या उन्हाळ्यात गेल्या दोन वर्षापूर्वीच्या कटू आठवणी जाणवल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे जायकवाडी- जालना योजनाच होय. आलीकडे जालनेकरांना दिवसेंदिवस दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्याचे कारण म्हणजे ठिक ठिकाणी जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात फुटल्या आहेत. मुळात नव्या व जुन्या जालन्यातील वसाहतीतील जलवाहिन्या या निझामकालीन आहेत. त्या जलवाहिन्या आता काही ठिकाणी जीर्ण अवस्थेत आल्या आहेत. परिणामी पाण्याचा दाब सहन करु शकत नाही. त्यामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. त्याद्वारे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय तर होतो आहेच शिवाय परंतु रस्त्यांसह नाल्यांमधील घाण, साचलेल्या पाण्यामुळेच जलवाहिनीतून काही वसाहतींना सर्रास दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. काही भागात पिवळसर असे पाणी नळांद्वारे येत असून, काही भागात पाण्यास दुर्गंधी येते आहे. या संदर्भात वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात ओरड सुरु झाली आहे. पाणी भरल्या व साठविल्याशिवाय पर्याय नाही, परंतु हे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. काही नागरिकांनी पाणी उकळून त्याचा वापर सुरु केला. तर काही ठिकाणी तेच पाणी पिण्यास वापरले जात आहे. ( प्रतिनिधी)१९३ कोटी १७ लाख रुपयांचा या योजनेवर खर्च झाला. परंतु एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा सद्य स्थितीत शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुर्जीवन करणे गरजेचे आहे. एका केंद्रातील जलशुद्धीकरणाचे काम ठप्पच आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेस १५ कोटी ४४ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.४प्रशासनाने जलवाहिन्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, पाण्याचा अपव्यय थांबवावा शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश नंद, संतोष गाढे यांनी केली.
जालनेकरांना दूषित पाणी
By admin | Updated: August 17, 2014 00:23 IST