जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी पातळीत पन्नास टक्क्यांच्या आत आहे. बहुतांश प्रकल्पांतून अवैध पाणी उपसा होत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांत अवघा ५ टक्के जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी हा साठा कमी आहे. गतवर्षी दोन्ही प्रकल्प मिळून १५ टक्के पाणी आहे. सातपैकी १ जोत्याच्या पातळीखाली तर लघु प्रकल्पांपैकी ७ कोरडेठाक तर ३१ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. एकही प्रकल्प ओव्हरफ्लो नाही. मध्यम प्रकल्पांपैकी ० ते २५ टक्के पाणीसाठा असणारे दोन, २६ ते ५० टक्क्यांमध्ये २ तर एका प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. ७६ ते १०० टक्के पाणीसाठा फक्त एका प्रकल्पांत आहे. लघु प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत ० ते २५ टक्के एवढा जलसाठा आहे. ५ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के जलसाठा आहे. एका प्रकल्पात ७६ ते १०० टक्के पाणी आहे. एकूणच प्रकल्पांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण भागात काही ठिकाणी आत्तापासूनच टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. टँकर तसेच विहिरी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहे.जलसाठ्यात पाणी नसल्याने विहिरी व कूपनलीकांतील पाणी संपूर्ण उन्हाळा पुरेल अशी चिन्हे नाहीत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. (प्रतिनिधी)
जलप्रकल्पांंतील जलसाठ्यांत झपाट्याने घट
By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST