परभणी : टंचाईग्रस्त शेतकऱ्यांचा जमीन महसूल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ६ लाख २८ हजार रुपयांचा महसूल माफ झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे़ दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस दगा देत आहे़ पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने खरीप, रबी हंगाम हातचे गेले असून, परिस्थिती गंभीर बनली आहे़ सलग दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी संकटांचा सामना करीत आहे़ यावर्षी देखील अशीच परिस्थिती असून, शासनाने परभणी जिल्ह्यातील सर्वच सर्व गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत़ टंचाईग्रस्त गावांसाठी १ नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार जमीन महसूलात सूट देण्याची योजना शासनाने जाहीर केली होती़ शासनाच्या या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे़ प्राप्त माहितीनुसार ६ लाख २८ हजार रुपयांची सूट या महसुलातून शेतकऱ्यांना मिळाली आहे़ परभणी तालुक्यात १ लाख ५७ हजार, गंगाखेड तालुक्यात ५३ हजार, पूर्णा तालुक्यात ९१ हजार, पालम ९४ हजार, पाथरी ३९ हजार, सोनपेठ ६५ हजार, मानवत ३८ हजार, सेलू ३९ हजार आणि जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५२ हजार रुपयांची सूट मिळाली आहे़ जिल्हाभरातील ३ लाख ७४ हजार ६९० शेतकऱ्यांना जमीन महसुलामध्ये सूट देण्यात आली आहे़ दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनाने जमीन महसुलात सूट देण्याच्या योजनेबरोबरच कृषीपंपाच्या विद्युत बिलातही ३३ टक्क्यांची सूट जाहीर केली आहे़ परीक्षा शुल्क माफीचा निर्णय देखील झालेला आहे़ या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असेल़ परंतु, अद्यापपर्यंत शासनाने थेट आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही़ सध्या परिस्थिती गंभीर होत चालली असून, पाणीटंचाई, बेरोजगारी या समस्यांबरोबरच व्यापारपेठेतील मंदी अशा समस्या निर्माण झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)
साडेसहा लाखांचा महसूल माफ
By admin | Updated: December 15, 2015 23:41 IST