निवघा बाजार : मौजे शिरड ता़ हदगाव येथील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१२-१३ मध्ये २९ घरकुल मंजूर झाले़ परंतु दोन वर्षे उलटली तरी लाभार्थी प्रतीक्षेतच असल्याने घरकुल मिळते की नाही असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे़शिरड येथील २९ लाभार्थ्यांची घरकुलाची निवड झाली तेव्हा लाभार्थ्यांकडून ग्रा़ पं़ ने घरपट्टी, नळपट्टी वसूल केली़ अडीच हजार रुपये भरून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढावे लागले़ यामुळे लाभार्थ्यांनी सावकारी कर्ज काढून पैशाची जमवाजमव केली, परंतु दोन वर्षे उलटले तरी अद्याप घरकुलाचा मावेजा मिळाला नाही़ याबाबत ग्रा़पं़ कार्यालयास विचारणा केली असता घरकुल योजनेस पाणीटंचाईमुळे स्टे आल्याचे सांगितले़ परंतु पाणीटंचाई संपली, दोन वर्षे उलटले तरी स्टे उठला नाही का? असा प्रश्न पडत आहे़याबाबत ग्रामविकास अधिकारी राहुल गिरबिडे यांना विचारणा केली असता पाणीटंचाई संपल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकाने पंचायत समितीला माहिती दाखल करायला हवी होती़ परंतु तसे त्यांनी केले नाही़ आता मी एक दोन दिवसांत वरिष्ठांना घरकूल संदर्भातील माहिती पुरवितो असे सांगितले़ केवळ ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून वंचित रहावे लागले एवढे मात्र खरे़ (वार्ताहर)
दीड वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत
By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST