लातूर : विद्यार्थिसंख्या कमी झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील १९० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झाले असून,यातील ७३ शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे़ मात्र संस्थाचालक समायोजित शिक्षकाला रूजू करून घेण्यास नकार देत आहेत़ त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी समायोजित केलेल्या शाळेतच शिक्षकांचे वेतन काढण्याचे निर्देश दिले असून, अशा समायोजित ५३ शिक्षकांची त्या शाळेशी लॉगीन करण्यात आली आहे़खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी झाल्यामुळे जिल्ह्यात १९० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झाले़ त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी राबविली़ दरम्यान, प्रक्रिया राबवित असतानाच अतिरिक्त शिक्षक झालेल्या संबंधित शाळांमध्ये २० जागा रिक्त झाल्या़ त्या जागेत पुन्हा समायोजन झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या़ त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या १७० वर आली़ त्यापैकी ७३ अतिरिक्त शिक्षकांच्या अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी मोरे यांनी काढले़ परंतु, संस्थाचालकांनी आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेण्यास नकार दिला़ परिणामी, शिक्षकांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात आणि संबंधित समायोजन झालेल्या शाळेत खेटे सुरू झाले़ परंतु, रूजू करून घेण्यास अडचणी निर्माण झाल्या़ त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आता ज्या शाळेत समायोजन केले त्या शाळेत या शिक्षकांचे लॉगीन केले आहे़ त्याच शाळेतून वेतन काढण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे़ समायोजन केल्याशिवाय रिक्त जागा भरण्यासही परवानगी नाकारली आहे़ ७३ शिक्षकांपैकी ५३ शिक्षकांची लॉगीन समायोजित शाळेवर करण्यात आली आहे़ लॉगीन झाल्यापासून वेतन त्या शाळेतूनच काढले जाणार असल्याचे शिक्षण अधिकारी गणपतराव मोरे यांनी सांगितले़
समायोजन झालेल्या शाळेवर वेतन !
By admin | Updated: February 4, 2017 23:41 IST