लातूर : लातूर मनपाच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ गुरूवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली़ एकूण १८ प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असून, अनुसूचित जातीसाठी १२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १९, खुल्या प्रवर्गासाठी ३८ आणि अनुसूचित जमातीसाठी ०१ जागेची सोडत मनपा आयुक्त रमेश पवार यांनी काढली़ लातूर मनपाच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत मे २०१७ मध्ये संपत आहे़ त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना, त्यावर हरकती, अंतिम प्रभाग रचना यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे़ या कार्यक्रमांतर्गत गुरूवारी आयुक्त रमेश पवार यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेतला़ ज्या प्रभागातील अ,ब,क, ड गटात नागरिकांच्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले नव्हते, त्या ठिकाणी या प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली़ तर अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गासाठी मतदारांच्या संख्येनुसार आरक्षण सोडत काढण्यात आली़ अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली़ संपूर्ण सोडत प्रक्रियेत कोणीही आक्षेप घेतला नाही़ इनकॅमेरा सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली़ यावेळी मनपाचे उपायुक्त संभाजी वाघमारे, नगर रचनाकार संजय देशपांडे यांचीही उपस्थिती होती़ आरक्षण जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी डीपीडीसीचे सभागृह गाठले होते़
प्रभागनिहाय आरक्षणाने वाजला लातूर मनपाचा बिगुल
By admin | Updated: December 22, 2016 23:49 IST