सेनगाव : थोर संत स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित रथयात्रेचे जिल्ह्यातील सेनगाव येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने या रथयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील मुख्य रस्त्यावरून सायकली मुलांचा सहभाग असलेली शोभायात्रा गावात काढण्यात आली. स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती भारतभर साजरी होत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी व जीवनदायी विचारांचा, अलौकिक चरित्राचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने पुणे येथील रामकृष्ण मठ यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर भव्य रथयात्रेचे आयोजन केले आहे. या रथयात्रेचे जिंतूर मार्गे सेनगाव येथे मंगळवारी आगमन झाले. सकाळी ९ वाजता रथयात्रा दाखल झाली. रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी येथील विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, व्यापारी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सेनगाव, भानेश्वर विद्यालय, ओमप्रकाश देवडा विद्यालय, लक्ष्मीबाई येवले विद्यालय, जिजामाता विद्यालय आदीच्या वतीने या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील मुख्य रस्त्यावरून सायकलीसह मुलांचा सहभाग असलेली शोभायात्रा गावात काढण्यात आली. या शोभायात्रेनंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, भानेश्वर विद्यालय, जिजामाता विद्यालय आदी ठिकाणी विद्यार्थी व युवकांच्या व्यक्तीमत्व विकासासंदर्भात व्याख्यान देण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंदच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या रथयात्रेच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सदस्य द्वारकादास सारडा, आप्पासाहेब देशमुख, मनसे जिल्हा सचिव संदेश देशमुख, माजी उपसरपंच डॉ. गणेश देशमुख, ओम पाटील कोटकर, विलास खाडे, उमेश देशमुख, सरपंच संजय वाघमारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केदार सारडा, ग्रामपंचायत सदस्य देवानंद दिनकर, सुधाकर जैन, मुख्याध्यापक प्रदीप बुदू्रक, पी.पी. कुलकर्णी, व्ही.डी. देशमुख, विजय येवले, सुमीत राठोड आदीसह अन्य ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती उत्सवस्वामी विवेकानंद रथयात्रा बुधवारी हिंगोली शहरात दाखल होणार असून, या निमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता जि.प. प्रशालेच्या मैदानावरून सुरू होणारी ही शोभायात्रा अग्रसेन चौक, इंदिरा चौक, जवाहररोड, अष्टविनायक चौक मार्गे सिटी क्लबवर पोहोचणार आहे. सिटीक्लबवर यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा स्वागत समितीचे अध्यक्ष आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, निमंत्रक खा. राजीव सातव, कार्यकारी अध्यक्ष तथा नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, कार्याध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, शोभायात्रा प्रमुख मनोज जैन आदींची उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यात विवेकानंद रथयात्रेचे आगमन
By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST