नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई उदभवणार नाही़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले़ पावसाने डोळे वटारल्याने यंदा दोन नक्षत्र कोरडे गेले़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असले तरी नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्र्रकल्पातील पाणीसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा आहे़ मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मी़ मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा भरण्याऐवजी कमी होत चालला आहे़ सध्या प्रकल्पात एकूण १३ टक्के साठा आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळावाआयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, विष्णूपुरी प्रकल्पात आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा असून जुलै अखेरपर्यंत पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणीपातळी वाढेल़ गरज पडली तर दिग्रस बंधाऱ्यातून आरक्षित पाणी घेण्यात येईल़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याची अपव्यय टाळावा़ बांधकाम किंवा इतर कामासाठी पाण्याचा वापर जपून करावा़ सध्या रमजान हा पवित्र महिना असून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ जर पाऊस पडला तर दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले़
विष्णूपुरीचा पाणीसाठा आॅगस्टपर्यंत पुरणार
By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST