केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील मराठवाडा व विदर्भात प्रसिद्ध असलेला शनि मारोती मंदिरात पोळ्याच्या करीनिमित्त पंचक्रोशीतील २० हजार भाविक भक्तांसह एक हजार बैलजोड्या दर्शनासाठी दाखल झाल्या. विदर्भातील रिसोड, सवड, व्याड, हराळ, घोटा, चिखली तसेच मराठवाड्यातील केंद्रा बु., ताकतोडा, कहाकर बु., म्हाळशी, वाघजाळी, शेगाव, खैरखेडा, वलाना, बटवाडी, मन्नास पिंपरी, हिवरा, माहेरखेडा, केंद्रा खुर्द, जामठी बु., गोंधनखेडा येथील अबालवृद्ध भाविक्त व महिलांनी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वरखेडा येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. वरखेडा येथील मंदिरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलजोड्यांनाही प्रदक्षिणेसाठी आणण्यात येते. यावर्षी १ हजार बैलजोड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली. अनेक वर्षांपासून पोळ्याच्या करीनिमित्त दर्शनाची ही परंपरा कायम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना रांगेत महाप्रसाद, चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी शनि मारोती संस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.पंचक्रोशीतून येणाऱ्या दिंड्या व भजनी मंडळाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी बैलजोड्यांची मिरवणूक व नंतर भारूडांचा कार्यक्रम झाला. गावात यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रसाळ यांनी १० पोलिस कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तासाठी नेमले होते. सर्व भाविकांना व बैलजोड्यांना रांगेत दर्शन मिळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. यशस्वीतेसाठी नवतरूण मंडळ, मारोती मंदिराचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)हिंगोली जिल्ह्यात तीन गावे वगळता पारंपारिक पद्धतीने पोळा उत्साहात साजरा झाला; परंतु पोळ्याचे बैल धुण्यासाठी एकाही नदी, नाला, ओढ्याला पाणी नव्हते. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांनी विहिरीतून पाणी शेंदून बैल धुवावे लागले. आदल्या दिवशी खांदे मळणीला देखील कडक ऊन पडले होते. औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथे पारंपारिक पद्धतीने पोळा साजरा झाला. गावातील मारोती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. घरोघरी बैैलांची पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच विनायकराव लेकूळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष लेकूळे, लक्ष्मणराव लेकूळे, शेषेराव मस्के, पोलिस पाटील रमेश कारंडे, गणेश खताळ, भीमाशंकरअप्पा क्यातमवार, शिवदासअप्पा क्यातमवार, राहूल क्यातमवार उपस्थित होते.औंढा तालुक्यातील कंजारा येथे पोळा साजरा झाला. यावेळी सरपंच रेखा कल्याणकर, उपसरपंच राजू गव्हाणकर, पोपा शेषराव कल्याणकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेशराव कल्याणकर, तातेराव कल्याणकर, साहेबराव कल्याणकर, त्र्यंबक कल्याणकर, डॉ. किशनराव कल्याणकर आदी उपस्थित होते.