वैजापूर : जमिनीच्या वादातून दोन सावत्र भावांच्या कुटुंबीयांमध्ये काठी, दगड व लोखंडी गजाने तुंबळ हाणामारी झाली. ही घटना तालुक्यातील आघूर येथेे रविवारी घडली असून तीन जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी फिर्यादीवरून याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आघूर शिवारात गट नंबर २१८ मध्ये सुनील व किरण राजपूत या दोन सावत्र भावांची जमीन आहे. या जमिनीबाबत दोघांमध्ये जुना वाद आहे. या वादातून रविवारी दोन्ही कुटुंबांमध्ये दगड, काठी व लोखंडी गजाने तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत सविता राजपूत, गुणाबाई राजपूत व कविता राजपूत या तीन महिला जखमी झाल्या. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून सुनील मगनसिंग राजपूत, शुभम विलास राजपूत, आकाश नारायण सिंग राजपूत, कविता सुनील राजपूत, गुणाबाई भगवानसिंग राजपूत, किरण मगनसिंग राजपूत (सर्व रा. आघूर), भगवान राजुसिंग चुंगडे (रा. पिंप्री), राजश्री पद्मसिंग राजपूत, सूरज पद्मसिंग राजपूत (रा. फुलंब्री) या नऊ जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.