आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत इशारा देण्ळात आला. गावातील ज्वलंत समस्या, जाण्या-येण्याचे रस्ते, डांबरीकरण न केल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय आव्हाना ग्रामसभेने घेतला आहे.आव्हाना येथे ग्रा. पं. कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता ग्रामसभा झाली. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. बी. साळवे यांनी माहिती अधिकाराविषयी सखोल माहिती दिली. त्यावेळी गावातील सर्व कार्यालयातील प्रमुख ग्रामसभेस उपस्थित होते. त्या सर्वांनी आपापल्या कार्यालयाच्या वतीने जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रमुख ठरावामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक पुरवठा करणे, वैद्यकीय अधिकारी मागणी, पशुवैद्यकीय अधिकारी व ईतर गावातील रिक्त पदे भरण्याबाबत ठराव घेण्यात आले. तंटामुक्ती अध्यक्षपदी सत्तार यांची पुन्हा निवड करण्यात आली. मनरेगा कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली. क्षेत्रफळ व कर आकारणी मान्यता देण्यात आली. त्या सर्व विषयानंतर मालखेडा-आव्हाना, आव्हाना -घारेवाडी, आव्हाना-आसडी रस्ते डांबरीकरण न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी माळीण येथील घटनेतील मृतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ग्रामसभेस सरासरी २०० सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष नामदेव सरोदे, मु. अ. तुपे, सोळुंके, तलाठी कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी साळवे यांच्यासह सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
मतदानावर बहिष्काराचा इशारा
By admin | Updated: August 17, 2014 00:16 IST