नांदेड : मनरेगाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील चालू व वर्ग झालेल्या तब्बल ६४ कामांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत़, परंतु या तक्रारींच्या चौकशीसाठी आॅक्टोबर २०१२ पासून दक्षता समितीच नसल्यामुळे घोटाळेबाजांना रान मोकळेच होते़ आता आयुक्तांच्या आदेशानंतर दहा सदस्यीय दक्षता समिती स्थापन केली असून त्यांच्यामार्फत सर्व प्रकरणांची कसून चौकशी केली जाणार आहे़मनरेगाअंतर्गत जिल्ह्यातील माहूर तालुक्यात-५, लोहा-२१, मुखेड-७, भोकर-१, नांदेड-३, कंधार-४, बिलोली-३, नायगाव-११, देगलूर-२, उमरी-१, किनवट-४ आणि हदगांव तालुक्यातील १ अशा एकूण ६४ कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत़ या सर्व तक्रारी २०१३ पर्यंतच्या आहेत़ परंतु या प्रकरणाच्या चौकशीसाठी असलेली दक्षता समितीच अस्तित्वात नव्हती़ त्यामुळे घोटाळेबाजांची चौकशी अन् कारवाईलाही सुरुवात झाली नव्हती़ त्यात माहिती अधिकार कार्यकर्ते मोतीराम काळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणांचा पाठपुरावा केला़ या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली की, तो अर्ज जिल्हा परिषदेकडे वर्ग केला जायचा़ अशाप्रकारे चौकशीसाठीही टोलवा-टोलवीचा खेळ सुरु होता़ त्यानंतर काळे यांनी मनरेगाच्या आयुक्तांकडेही पाठपुरावा केला़ शेवटी या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयकांनी दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले़ या समितीत पथकप्रमुख यु़डी़तोटावाड, वाहबोद्दीन फारुकी, ए़एल़शिरफुले, अ़द़लव्हेकर, एऩएस़देशपांडे, वाय़डी़जाधव, जवाहर निलमवार, आऱपी़भोसीकर, शेख शब्बीर लालशा व एल़एस़दहिवाल या दहा सदस्यांचा समावेश आहे़ या पथकाला स्वतंत्र वाहन व प्रवास भत्ता आकस्मिक खर्च मनरेगा कक्षातील ६ टक्के निधीतून भागविण्यात येईल़ तसेच या पथकासाठी नव्याने सदस्यही घेण्यात येणार आहेत़ कामात हलगर्जीपणा झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ दक्षता समितीच्या स्थापनेमुळे मनरेगा घोटाळ्याच्या चौकशीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे़ (प्रतिनिधी)
दक्षता समिती स्थापन
By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST