औरंगाबाद : सळसळता उत्साह, ओसंडणारा जल्लोष, उस्फू र्त घोषणा अन् शिट्ट्यांनी दणाणून गेलेले सभागृह... अवघ्या तरुणाईची एकच उत्कंठा ... ‘तो’ कधी येणार? ....आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनेता सचिन खेडेकर व ‘टीम गुलाबी’चे आगमन झाले, तेव्हा आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक तरी छबी मोबाईलमध्ये टिपता यावी यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू झाली. ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजित या गप्पांच्या मैफलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणांच्या भेटीसाठी आलेल्या सचिन खेडेकर व त्याच्या टीमने तरुणाईशी दिलखुलास संवाद साधत धमाल केली. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि बारबाला यांच्यातील संघर्षासह त्यांच्या प्रेमाची कथा सांगणारा ‘गुलाबी’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त ही गप्पांची मैफलरंगली. चित्रपटाचे निर्माते अनिकेत कर्णिक व रेणुका कर्णिक, चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करणारे दिग्दर्शक गुड्डू धनोआ, ‘सिंघम’ फेम विनीत शर्मा, गीतकार एम. प्रकाश व दिलीप सेन या ‘टीम गुलाबी’सह महाविद्यालयाचे प्राचार्य अडवाणी व अधिकारी नितीन भस्मे उपस्थित होते. ऐश्वर्या पालोदकर यांनी कलाकारांशी संवाद साधला. आजवरच्या कारकीर्दीत पोलीस अधिकारी साकारण्याची संधी प्रथमच मिळत असल्याचे सांगत सचिन म्हणाला, ‘ही माझी भूमिका म्हणजे केवळ दबंगगिरी नसून त्याला प्रेमकथेचीही जोड आहे. माझे गुरू विनय आपटे यांचीसुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे.’ गुड्डू धनोआ म्हणाले, ‘मी या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करीत आहे. निर्मितीदरम्यानही सचिनची मला अनेकार्थाने मदत झाली.’ उत्तम रंजनमूल्ये असलेला हा चित्रपट तरुणांनी कुटुंबासह पाहावा, असे आवाहनही कलाकारांनी केले.
महाविद्यालयात युवा जल्लोषाचे दर्शन
By admin | Updated: September 6, 2014 00:42 IST