हिंगोली : भरधाव ट्रकने सायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ आॅगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास हिंगोली तहसील कार्यालयासमोर घडली.मयताचे नाव मुरलीधर गणपतलाल शर्मा (५० रा.कासारवाडा, हिंगोली) असे आहे. ते सोमवारी रात्री शहरातील अकोला रस्त्याने निर्मल आॅईल इंडस्ट्रीजकडून घराकडे सायकलने जात होते. तेव्हा पाठीमागून आलेल्या ट्रक क्र. एम.एच.३० ए.बी.१३९८ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून मुरलीधर शर्मा यांना जोराची धडक दिली.यात त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद दीपक मुरलीधर शर्मा यांनी हिंगोली शहर पोलिसांत दिली. या घटनेने शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर पथदिवे नाहीत. खड्डेही पडले. या सर्व प्रकारात शर्मा यांचा हकनाक बळी गेला. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. (वार्ताहर)
जड वाहतुकीने घेतला वृद्धाचा बळी
By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST