जालना : उन्हाळा लागताच फळ तसेच पाले भाज्यांचे भाव कडाडले आहेत. रविवारी भरणाऱ्या भाजीबाजारात दर वाढल्याचे चित्र होते. प्रत्येक भाजीचे किलोमागे चार ते पाच रूपयांनी वाढ झाली होती. जिल्ह्याचा पारा चाळीस अंशांवर जात आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका व तलावातील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. परिणामी पाणी कमी असल्याने उत्पादन कमी होत असून, भाजीपाल्याच्या भावात तेजीमंदी होत आहे. आठ ते दहा रूपये किलो मिळणार टमाटे पंधरा रूपये किलोवर गेले आहेत. मेथी, पालक, कोथंबीर यांच्या जुड्या पुन्हा महागल्या आहेत. काही ठिकाणी पाचच्या दोन अथवा तीन मिळत होत्या. जानेवारीत पाच रूपयांच्या पाच जुड्या मिळत होत्या. कारले, वांगे, सिमला मिरची, दोडगे, शेवगा आदी भाज्या ४० रूपये किलो मिळत आहे. आवक कमी होत असल्याने व्यापारीही जादा दराने भाजी विक्री करीत आहेत. कांदा दहा ते वीस रूपये किलो आहे. एकूणच उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडतील असे भाजीपाला उत्पादक शेतकरी जाधव यांनी सांगितले.
उन्हाळा लागताच भाजीपाला कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 23:50 IST