लोहारा : शहरात भाजी मंडई नसल्याने शिवाजी चौकातच रस्त्याच्या कडेला बसून जीव मुठीत धरुन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकरी व व्यापारी वर्गावर आली आहे. त्यामुळे नगर पंचायतीने येथे स्वतंत्र भाजीमंडई उभी करावी, अशी मागणी होत आहे.लोहारा हे शहर तालुक्याचे ठिकाण असून, येथे भाजीपाला विक्रेत्यांना स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा, शहरातील शिवाजी चौकातील रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावी लागते. पाणीटंचाईमुळे इतर पिके हाती न लागल्याने बहुतांश शेतकरी सध्या भाजीपाला व्यवसायाकडे वळाले आहेत. शहरातून जाणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर दहा ते पंधरा किमी अंतरावर चार ते पाच गावे येतात. त्यामुळे येथे दररोज ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाजी चौकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असे. त्यातच बेशिस्त वाहने पार्र्कींग केली जात असल्याने चौकात नेहमीच वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होते. यात या भाजीपाला विक्रेत्यांची आणि बाजारकरूंची गर्दी होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजी चौकात महिलेच्या पायावरुन ट्रक गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे नगरपंचायतने येथे स्वतंत्र भाजीमंडई उभी करावी, अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यातून होत आहे. दरम्यान, याबाबत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्यधिकारी एन. के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सध्या नगरपंचायतीचा कारभार प्रशासकावर आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच भाजीमंडईचा प्रश्न मिटू शकेल, असे त्यांनी सांगितले.
भररस्त्यात भाजीपाल्याची विक्री
By admin | Updated: December 20, 2015 23:49 IST