जालना : दुष्काळी परिस्थिती व त्यातच अल्यप पाणीसाठा यामुळे भाजीपाला उत्पादनात घट येत आहे. शेतकरी मोठ्या परिश्रमाने भाजीपाल्यांचे उत्पादन काढत असले तरी शेतकऱ्यांकडील भाजीपाला कवडीमोल भाव देऊन खरेदी केला जात आहे.जालना बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह नगर, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होते. गत काही दिवासांपासून फळ तसेच पालेभाज्यांचे भाव सातत्याने वाढत आहेत. परिणामी सर्व सामन्यांचे बजेट कोलमडत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप तसेच रबी पिकांचे उत्पादन निम्म्याने घटले. यामुळे आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला. जालना तालुक्यातील जामवाडी, इंदेवाडी, गोलापांगरी, बठाण, कारला, खादगाव, निधोना, वाघ्रूळ आदी गावातून कोबी, मेथी, पालक, टोमॅटो, मिरची, कारले, दोडके, गवार आदी भाज्यांची दररोज मोठ्या प्रमाणात आवक होते. शेतकरी काबाडकष्ट करून भाज्यांचे उत्पादन घेत असले तरी त्यांना भाव कवडीमोल मिळतो. मात्र हाच भाजीपाला ग्राहकांपर्यंत कितीतरी पटीने महाग होत असल्याची खंत भाजीपाला उत्पादकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)पालेभाज्या उत्पादन जिकिरीचे काम आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून उत्पादन काढले जाते. उत्पादनपासून ते बाजारपेठेत भाजी आणेपर्यंत शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. एवढे करूनही किरकोळ भाव मिळतो. साधारणपणे आम्ही १००० मेथी गड्डी ८० पैसे या प्रमाणे भाव मिळतो. काही वेळा ६० ते ७० पैशांवर समाधान मानावे लागते. हीच मेथीची गड्डी व्यापारी ग्राहकांना २ ते ३ रुपयांना देतात. यात व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. शेतकऱ्यांना केलेला खर्चही निघत नाही.- दत्तात्रय खरात, भाजीपाला उत्पादक शेतकरी, वाघ्रुळजालना शहरातील जुना तसेच नवीन जालना भागात भाजी मार्केट आहे. या ठिकाणी भाज्यांचे दर काडाडलेच आहेत. नवीन जालना भागातील भाजी मंडईत हे भाव जास्त असल्याची महिलांची प्रतिक्रिया आहे. कांदे, १५ ते ३० रूपये प्रति किलो, बटाटे १५ ते ३५, गवार २० रूपये, शेवग्याच्या शेंगानाही चांगला भाव आला आहे. शेवगा ८० रुपये प्रति किलोवर आहे. कारले व सिमला मिरचीने पन्नाशी गाठली आहे. यामुळे शंभर रुपयांत काहीच भाजीपाला मिळत नसल्याची सर्व सामान्यांचे उत्तर आहे. मेथी, पालक, चुका, करडई आदी भाज्यांची गड्डी २ रुपयांना तर काही ठिकाणी १० रुपयांत पाच अथवा सहा मिळत असल्याचे सर्वच भाजी मंडईतील चित्र आहे.
भाजीपाल्यांचे भाव कडाडले
By admin | Updated: December 3, 2015 00:31 IST