वाशी : भरधाव ट्रेलरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने वाशी येथील एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला़ तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला़ ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेटफळ गावाजवळील माढा फाट्याजवळ घडली़ वाशी येथील ओंकार चंद्रकांत साळुंखे (वय-२१) व त्याचा मित्र विशाल नंदकिशोर खुडे (वय-२५ रा़ वाशी़मुंबई) हे दोघे पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत़ बुधवारी दुपारी महाविद्यालय संपवून सुटीनिमित्त ते दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-व्ही़००५४) वाशीकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी शेटफळ येथील माढा फाट्याजवळ आली असता पाठीमागून आलेल्या ट्रेलरने (क्ऱआऱजे़०६- जी़ए़३१७५) जोराची धडक दिली़ यात ओंकार साळुंखे या युवकाचा जागीच मृत्यू झाला़ तर विशाल खुडे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ राजेंद्र साळुंखे यांच्या फिर्यादीवरून ट्रेलर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ अविनाश शिंदे हे करीत आहेत़दरम्यान, ओंकार हा घरात एकुलता एक मुलगा होता़ त्याच्या अपघाती निधनाने साळुंखे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)
वाशीच्या युवकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 01:13 IST