वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वळदगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण ११ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच सीमा पहाडिया वगळता इतर १० नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
वळदगाव ग्रामपंचायतीची गत पंचवार्षिकला अटीतटीची निवडणूक झाली होती. यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी करून मतदारांशी संपर्क वाढविला. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अंतिम तारखेपर्यंत ४० नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. गावातील एकोपा कायम राहावा तसेच निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनाकडून मोठे बक्षीसही दिले जात असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गावातील वडीलधारी मंडळीचा मान ठेवत निवडणुकीत होणारा वायफळ खर्च टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास उमेदवारांनी सहमती दर्शविली. गावाच्या विकासासाठी सर्वांचे एकमत झाल्यानंतर सोमवारी (दि. ४) इतर सर्व उमेदवारांनी नामाकंन अर्ज मागे घेऊन ११ सदस्यांची बिनविरोध निवड केली.
माजी सरपंच वगळता १० नवीन चेहऱ्यांना संधी
या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. माजी सरपंच सीमा रितेश पहाडिया वगळता इतर १० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकूण ११ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे. गणेश कडुबा नवले, संजय त्र्यंबक झळके, नंदा सुभाष साबळे, प्रीती मनेश शिंदे, गंगा अविनाश घुले, विष्णू रंगनाथ झळके, वैशाली विनोद खोतकर, अशोक रमेश खोतकर, अमर कचरुसिंग डांबर, वर्षा महेश घोडके व सीमा रितेश पहाडिये आदी.
ग्रामस्थांचा जल्लोष
वळदगाव ग्रामपंचायतीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवडणूक झाली असून, दशकभरापूर्वीही या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या सर्व ११ जागेची बिनविरोध निवड झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शन घेतल्याने ग्रामस्थांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चंद्रभान झळके, बाबासाहेब झळके, बाबासाहेब नवले, कैलास चुंगडे, सुभाष साबळे, कांतराव नवले, विष्णू झळके, कल्याण नवले, जनार्दन झळके, आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ- वळदगाव ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांसोबत जल्लोष केला.
----------------------