औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये वैजापूरमध्ये सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सिल्लोडमध्ये आठ टक्के ,तर गंगापूर- खुलताबादमध्ये सुमारे सात टक्के मतदान वाढले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पंचरंगी लढती झाल्या, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत सिल्लोड (६७.३८ टक्के), कन्नड (६३.०३), फुलंब्री (६८.७६), औरंगाबाद मध्य (६१.५१), औरंगाबाद पश्चिम (६४.०१), औरंगाबाद पूर्व (६३.३६), पैठण (६९.९२), गंगापूर- खुलताबाद (६०.६३), वैजापूर (५९.२१) अशी मतदानाची टक्केवारी होती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सिल्लोड (७५.२६ टक्के), कन्नड (६८.०६), फुलंब्री (७३), औरंगाबाद मध्य (६५.१८), औरंगाबाद पश्चिम (६४.३३), औरंगाबाद पूर्व (६६.७६), पैठण (७३.७८), गंगापूर- खुलताबाद (६७.८२), वैजापूर (७०.१०) असे मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीशी तुलना करता कन्नड आणि फुलंब्री मतदारसंघात मतदान सुमारे पाच टक्क्यांनी वाढले आहे, तर औरंगाबाद मध्यमध्ये ते चार टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये तीन टक्क्यांनी, तर पैठणमध्ये साडेतीन टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघांत मात्र मतदान केवळ १३ हजार ४७० मतांनी वाढले आहे. हे वाढीव मतदान एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
वैजापुरात टक्का वाढला
By admin | Updated: October 18, 2014 00:05 IST