औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरणाच्या सहाव्या दिवशी सोमवारी १७०० पैकी ९७७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. ७२३ कर्मचाऱ्यांनी मात्र, लसीकरणाकडे पाठ फिरविली. जिल्ह्यात ५७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.
जिल्ह्यात शहरातील आठ आणि ग्रामीण भागांतील सात अशा १५ केंद्रांवर लसीकरण झाले. शहरात दोन नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात ६२४ जणांचे लसीकरण झाले, अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. शहरात लसीकरणानंतर तिघांना किरकोळ रिॲक्शनचा त्रास झाला. ग्रामीण भागात नव्याने सुरू केलेल्या कन्नड, खुलताबाद येथील केंद्रांत चांगल्या प्रमाणात लसीकरण झाले. पाचोड येथेही डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. ग्रामीण भागात ५० टक्के लसीकरण झाले. सात केंद्रांवर ३५३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात २८७२ लसीकरण
लसीकरणाच्या सहा दिवसांत शहरात घाटीसह महापालिकेच्या लसीकरण केंद्रांत एकूण दोन हजार ८७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आले आहेत. घाटी रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. ६०० पैकी केवळ २३८ आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेतली आहे.
रिॲक्शनची संख्या ११८
लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत रिॲक्शन झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ११८ झाली आहे. यात एकाही रुग्णाला गंभीर स्वरूपात रिॲक्शन झालेली नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.