कन्नड : कोरोना प्रतिबंधक लस देताना प्राथमिक आरोग्य केंद्रावर सावळागोंधळ झाल्याच्या तक्रारी सामाजिक माध्यमावर प्रसारित होत आहेत. यात लस घेण्यासाठी वय नोंदविताना फेरफार करण्यात आले आहे. तसेच विनारजिस्ट्रेशन २६ लोकांना लस टोचण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शासनादेशाची पायमल्ली करणाऱ्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कन्नड तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र हे कन्नड ग्रामीण रुग्णालयात आहे. मात्र, असे असतानाही चिकलठाण केंद्रात कमी वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केल्याची घटना समोर आली आहे. या लोकांचे रजिस्ट्रेशन न करता हे लसीकरण कसे काय केले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. चिकलठाण येथे २१२ लोकांना लस टोचण्यात आली. आणि रजिस्ट्रेशन केवळ १८६ लोकांचेच केले आहे. यामुळे येथे सावळागोंधळ निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठरावीक लाभार्थींसाठी वेगळा नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम का लावण्यात आला, याचे उत्तर मिळू शकले नाही. असाच प्रकार नागद केंद्रावर झाल्याच्या तक्रारी समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.
एकीकडे नोंदणी होत नसल्याच्या कारणावरून आणि केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या नावाखाली ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देण्याचे नाकारण्यात आले तर १८ ते ४४ वयोगटातील ठरावीक लाभार्थींना विनानोंदणीचा पहिला डोस देण्यात आल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
घडलेल्या प्रकाराबाबत खुलासा मागितला
दरम्यान, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन चौकशी केली. त्यांनी सांगितले की, नोंदणी करण्यात आलेले रजिस्टर व प्रत्यक्षात लसीकरण करताना नोंद घेण्यात आलेल्या रजिस्टरमधील लाभार्थी यांच्या संख्येत तफावत आढळून आली आहे. दोन्ही रजिस्टरवर घेण्यात आलेल्या नोंदींचा ताळमेळ घालून देण्याबाबत सांगण्यात आले असून, घडलेल्या प्रकाराबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.