जालना : जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित स्व. किसनसेठ गोरंट्याल चषक आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उर्दू हायस्कुलचा संघ विजेता तर सेंट जॉन्स इंग्लिश स्कूलचा संघ उपविजेता ठरला.येथील आझाद मैदानावर १ सप्टेंबरपासून आयोजित या स्पर्धेत १६ शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना रविवारी उर्दू हायस्कूल व सेंट जॉन्स इंग्लिश स्कूल यांच्यात झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १- १ गोलची बरोबरी साधल्याने टायब्रेकर पद्धतीने सामन्याचा निर्णय घेण्यात आला. यात ३ विरूद्ध १ गोलने उर्दू हायस्कूलचा संघ विजयी ठरला.विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, एकबाल पाशा, डॉ. जे. ए. किर्तीशाही, विवेक निर्मल, हरेश तलरेजा, रमशे शेळके, विष्णू वाघमारे, विनोद यादव, राज स्वामी, रवींद्र बांगड उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल म्हणाले की, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी खेळाडूंसाठी स्पर्धा घेतल्या जाते. जालन्यातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून लवकरच चांगल्या खेळाडूंची टीम तयार करून आयपीलच्या धर्तीवर फुटबॉल स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच प्रत्येक खेळाडूंचे स्वप्न असते की चांगल्या मोठ्या स्पर्धेत नाव कमवावे. त्यामुळेच फुटबॉल साठी प्रसिद्ध असलेली संतोष ट्राफी जालन्यात आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोरंट्याल यांनी यावेळी सांगितले.एकबाल पाशा म्हणाले की, जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात विविध स्पर्धा आयोजित करून क्रीडा क्षेत्रात तसेच शहराच्या विकासातही त्यांनी मोठे योगदान दिले. आज मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे लातूर सारख्या जिल्ह्यात रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. गोरंट्याल यांनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करून शहराचा पाणी प्रश्न सोडविला. नसता जालन्यावरही तशीच वेळ आली असती. जालन्यातील जनतेकडून मोठी चुक झाली. मात्र ती जालनेकर भरून काढतील असे सांगून आगामी सणउत्सव सर्व धार्मिय बांधवांनी शातंतेत व एकत्रित साजरे करून एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच शेख जावेद, मोहमंद अकबर, शोकत पठाण, सुनील हस्तक, रमेश शेळके, राजेंद्र वाघमारे, शिवाजी धोत्रे, मोहमंद मुस्ताक, प्रभूदास ठाकुर, इम्रान सिद्धीकी, सचिन जैस्वाल, श्याम परदेशी आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उर्दू हायस्कूल संघ अजिंक्य
By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST