बीड : जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची ६० पदे रिक्त आहेत. यामध्ये एकट्या केज तालुक्यात १७ जागा दोन वर्षांपासून रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.केज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या १० आहे. या सर्व शाळांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेख मुसा यांनी केला. मराठी माध्यमाचे हजारावर शिक्षक अतिरिक्त ठरलेले असताना उर्दू माध्यमाला मात्र शिक्षक नाहीत. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. उर्दू माध्यमाच्या शिक्षणप्रेमी नागरिकांनी शनिवारी सीईओ नामदेव ननावरे यांची भेट घेऊन रिक्त ठिकाणी शिक्षक नेमण्याची मागणी केली. मोहम्मद जाकेर, पठाण हदीम, शेख नाजेमा, शेख अर्शद, शेख फकरोद्दीन, फारोकीबी लाल, सय्यद राशेद, काझी खालेद, शेख आसमा, शेख समीर, शेख पाशा, सय्यद अर्शिया यांची उपस्थिती होती.आंदोलनाची तयारीउर्दू माध्यमाला शिक्षक देण्यासाठी उर्दू शिक्षण संघर्ष समितीच्या वतीने १४ आॅगस्टपर्यंतची मुदत प्रशासनाला देण्यात आली आहे. शिक्षक न नेमल्यास विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)
रिक्त पदांमुळे उर्दू शिक्षणाचे वांधे
By admin | Updated: August 9, 2015 00:31 IST