औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ५६ वर्षांच्या कार्यकाळात अनेक स्थित्यंतरे पाहिली. सुरुवातीला अवघ्या ३ हजार विद्यार्थी व ९ महाविद्यालयांपासून सुरू झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत आज ३९२ महाविद्यालये व ३ लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. २३ आॅगस्ट १९५८ रोजी मराठवाड्यात हे पहिले विद्यापीठ सुरू झाले. तेव्हा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी झाली. मराठवाडा हा तसा सर्वच दृष्ट्या मागास असलेला विभाग होता. विद्यापीठ स्थापन करण्यासाठी किमान १०० महाविद्यालये असावीत. या विभागात तेव्हा उच्चशिक्षण देणारी मिलिंद महाविद्यालयाबरोबर अवघी ५ महाविद्यालयेच होती. त्यामुळे तेव्हाच्या प्रधान सचिवांनी औरंगाबादेत विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळला. ही बाब मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना समजली, तेव्हा त्यांनी मराठवाड्यात विद्यापीठ असायलाच हवे. महाविद्यालये नसतील तर तिथे महाविद्यालये वाढवा, अशी भूमिका घेत औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर त्यांनी बुद्धलेणीच्या अलीकडे जवळपास ७५० एकर जमीन विद्यापीठासाठी दिली. सुरुवातीला या विद्यापीठाचा कारभार सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत सुरू झाला. सुरुवातीचे कुलगुरू म्हणून एस. आर. डोंगरकेरी यांनी १९ जून १९५८ ते १८ जून १९६४ पर्यंत कार्यभार सांभाळला. त्यानंतर ५६ वर्षांच्या काळात या विद्यापीठाला १५ कुलगुरू मिळाले. १९७१ ते १९७४ या कालावधीत कुलगुरू म्हणून डॉ. आर. पी. नाथ यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी नाट्यशास्त्र आणि वृत्तपत्रविद्या हे दोन विभाग सुरू केले. त्यानंतर १९७८ साली वसंतराव काळे यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत नामांतराचा ठराव पारित केला. त्यानंतर विधानसभा व विधान परिषदेतही नामांतराच्या ठरावास अनुकूलता दर्शविण्यात आली आणि मराठवाड्यात रातोरात दंगली सुरू झाल्या. संपूर्ण मराठवाडा आगीत धुमसत होता. याचा परिणाम अध्ययन व अध्यापन तसेच संशोधनावर झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या ५६ वर्षांच्या कार्यकाळात मर्यादित साधन, सुविधांच्या माध्यमातून गरूडझेप घेतली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संशोधन व अध्ययनाला महत्त्व तर दिलेच, याशिवाय संशोधन हे समाजाच्या समृद्धीसाठी हवे, हा मंत्र कायम जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण आणि त्याचबरोबर विभाजनही झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने सुरू झालेल्या या विद्यापीठाच्या विभाजनानंतर जवळपास निम्मी पदेही कमी झाली. आजच्या तारखेत या विद्यापीठात शिक्षकांची २५० पदे मंजूर असून, त्यापैकी ७० पदे रिक्त आहेत. महाविद्यालये वाढली. विद्यार्थ्यांची संख्या वाढली. वेगवेगळे विभाग, नवनवीन अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरू झाले. तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी या विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळवून दिला. आताचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मागील ५६ वर्षांत विद्यापीठाने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने आज हे विद्यापीठ आहे. त्यांच्या नावाला शोभेल असा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविण्यासाठी आगामी ५ वर्षांमध्ये ‘रोड मॅप’ आखण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे हे कटिबद्ध आहेत.प्राणीशास्त्र विभाग हा देशातील पहिल्या क्रमांकाचा १९८३ मध्ये विद्यापीठाचा रौप्यमहोत्सव झाला. त्यानंतर १९८४ मध्ये विद्यापीठात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र हे स्वतंत्र विभाग सुरू झाले. आजघडीला या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग हा देशातील राज्य विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे.
केंद्रीय दर्जा मिळविण्याकडे विद्यापीठाची वाटचाल
By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST