औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागात महिन्यापासून अभियंत्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशासनातील राजकीय कट-कारस्थानामुळे दोन अभियंत्यांची आजवर उचलबांगडी झाल्याची चर्चा विभागात सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसण्याची शक्यता आहे.शनिवारी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष कंत्राटदारांनी २५ ते ३० टक्के रक्कम दिल्याशिवाय बिले मिळत नसल्याचा खळबळजनक आरोप केला होता. मुळात कंत्राटदारांचा हा आरोप जालना जिल्ह्यातील काही अभियंत्यांबाबत होता. त्यांनी बैठकीत कोणत्याही अभियंत्याचे नाव घेऊन आरोप केले नव्हते. परंतु त्या आरोपांचे थेट खापर कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांच्यावर फुटले. त्यांची तातडीने मुंबईला बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचा पदभार वृषाली गाडेकर यांच्याकडे देण्यात आला. ५ डिसेंबरच्या बैठकीत गाडेकर यांच्या कार्यशैलीबाबत आ. हर्षवर्धन जाधव यांनी बांधकाम मंत्र्यांसमक्ष तक्रारी केल्या होत्या. गाडेकर आणि आ.जाधव यांच्यात बैठकीदरम्यान प्रश्नोत्तरे झाली होती. गाडेकर यांच्याकडे सुखदेवे यांचा पदभार देण्यात आला आहे. या प्रकारामुळे बांधकाम विभागातील अभियंते अवाक् झाले आहेत. उत्तर विभागातील कामेही झालेली नाहीत. त्या विभागाला तर अभियंताच नव्हता. पश्चिम व उत्तर विभागात ५० टक्के कामे सुरू झाली आहेत. कार्यकारी अभियंता सुखदेवे यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव ए. बी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच सुखदेवे हे ‘नॉनकरप्ट’अभियंते आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुखदेवे यांच्या बदलीची आॅर्डर अजून काढण्यात आलेली नाही. त्यांची बदली रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
अभियंत्यांमध्ये अस्वस्थता...!
By admin | Updated: December 8, 2015 00:08 IST